डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महापालिका विभागात पावसाळ्यात रस्तोरस्ती खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून पालिका प्रशासन स्वस्थ बसून आहे. आठवडाभर पावसाने उघडीप देऊनही खड्डे बुजविले जात नाहीत. ‘ई’ प्रभाग क्षेत्रातील मानपाडा-उंबार्डी रस्त्याची खड्यांमुळे अवस्था बिकट झाली आहे. खड्ड्यांमुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव जाऊ शकतो. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनाच्या निषेधार्थ रिपाइंने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडी तर्फे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘ई’प्रभाग क्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात इशारा देण्यात आला आहे कि, प्रभाग क्षेत्रात रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली असून त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. खड्यांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये-जा करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. याबाबत पालिका प्रशासनास अनेक वेळा सूचना करूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अखेर तातडीने लेखी निवेदन देण्यात येत आहे अशी माहिती रिपाइं डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड दिली. ते पुढे म्हणाले की, यानंतर येत्या आठवड्यात खड्डे बुजविण्याचे काम झाले नाही तर मात्र आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.