रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): जागतिक हदय दिन आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आयुष विभागातर्फे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त २९ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत आरोग्य शिबीर, आरोग्य तपासणी, नामांकित डॉक्टरांची व्याख्याने आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना डॉ. देवकर म्हणाले, सध्या संसर्गजन्य आजारापेक्षा असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे असंसर्गजन्य रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी १ जानेवारी २०१५ पासून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमाची सुरूवात रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाली. सध्या असंसर्गजन्य रोगामुळे मृत्यू पडणाऱ्यांचे प्रमाण ६४ टक्के एवढे असून, त्यामध्ये ३३ टक्के प्रमाण हदयरोगासंबंधी आहे़ बदलती जीवनशैली, चुकीचा आहार-विहार यामुळे या रोगाचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे हाच त्यावर एकमेव मार्ग असून, गरम पाय, नरम पोट आणि थंड डोके या त्रिसुत्रीचा वापर केला, तर असंसर्गजन्य आजार नियंत्रणात ठेवण्यात येतो, असे डॉ. देवकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आयुष विभागाचे डॉ. अश्ताफ काझी यांनी सांगितले, स्ट्रेस, ब्लडप्रेशर, डायबेटीस, हार्ट डिसीज, सोयरासिस इत्यादी आजार हे असंसर्गजन्य आहेत. या सर्व आजारांचे सद्यस्थितीत प्रमाण वाढत आहे़ केवळ या आजारांवर औषधोपचार करण्याऐवजी या आजारांचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय करणे महत्वाचे आहे. दरम्यान, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.