मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल हायटेक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आतंरराष्ट्रीय टेक्नोलॉजी असलेला रोबो मॅन लवकरच दलात दाखल होणार आहे. यामुळे धुरांच्या लोट व धगधगणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे. दरम्यान, जून- जुलै महिन्यात रोबो दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई सारख्या वर्दळीच्या ठिकाणी सातत्याने आगीच्या घटनां घडतात. अरुंद गल्ल्या, खाद्यपर्दार्थ व्यवसाय, उद्योग धंद्यामद्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी इंधने. परिणामी काही क्षणात आगी भडकण्याची स्थिती असते. अनेकदा अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालून नियंत्रण मिळवतात, गंभीर जखमी होतात. यामुळे नव्या वर्षात अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी अनेक महत्वपूर्व योजना राबविल्या जाणार आहेत. आगीचा भडका आणि चटक्यांपासून बचाव करण्यासाठी थ्री-लेयर हायटेक सूट आणल्यानंतर आगीच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवेश करून आग विझवण्याची यंत्रणा घेऊन जाणारा रोबो आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. चिंचोळ्या गल्ल्या, बेसमेंट, धुराच्या ठिकाणी जाण्याचे निर्देश कॉम्प्युटरच्या माध्यमातून रोबोटला दिल्यास आगी नियंत्रणात आण्याचे काम रोबो करणार आहे. यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरले असून परदेशी तज्ज्ञ कंपन्यांची टेक्नॉलॉजी यात वापरली आहे. याचा दर्जा आणि टेक्नॉलॉजीची तपासणीही आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाईल. प्राथमिक तत्त्वावर हा रोबो आणण्यात येणार असून याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अरुंद, चिंचोळ्या गल्ल्या किंवा अडगळीच्या ठिकाणी आग विझवण्यास जवानांना पोहोचणे कठीण होते. परिणामी आग भडकण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी रोबोची मदत होईल, अशी माहिती मुंबई अग्निशमन प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली.