मुंबई : रस्ते कामात झालेल्या घोटाळ्यातील ३४ रस्त्यांचा अहवाल आज आयुक्तांना सादर करण्यात आला. यात १०० अभियंत्यांपैकी ९६ दोषी आढळून आले. तर चार जणांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
माजी महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर यांनी रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कामाची चौकशी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले. तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने २३४ पैकी ३४ रस्त्यांची चौकशी पूर्ण केली असून, उर्वरित २०० रस्त्यांच्या कामांतील त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याबाबतचा अहवाल लवकरच देण्यात येणार आहे. शनिवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे व प्रमुख चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांना दिले होते. यात ३४ रस्त्यांतील १०० अभियंते समाविष्ट होते. यापैकी ९६ अभियंत्यांपैकी ४ जणांना सेवेतून काढले आहे. तीन अभियंत्यांच्या निवृत्तीवेतनात कपात केली असून, सहा अभियंत्यांना मुळ वेतनावर नेले आहे, तीन वर्षांसाठी एका अभियंत्याची कायम वेतनवाढ, दोन वर्षांसाठी पाच अभियंत्यांची कायम वेतनवाढ आणि एक वर्षासाठी २५ अभियंत्यांची कायम वेतनवाढ रोखली आहे. तर ३४ अभियंत्यांची एक वर्षासाठी तात्पुरती वेतनवाढ बंद केल्याचे या अहवालात म्हटले आहे.