मुंबई : अपघातामध्ये महाराष्ट्र देशात दुर्दैवाने तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील विशेषत: ग्रामीण भागात दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याबरोबर दुचाकींच्या अपघातांची आणि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्टचा वापर यासारख्या छोट्या उपाययोजनांचा अवलंब केल्या तरी अपघातातील मोठी जिवीतहानी टाळता येऊ शकेल. त्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने आणि सजगपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले.परिवहन विभागामार्फत राज्यात नुकताच रस्ते सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. आज मुंबईत या पंधरवड्याचा सांगता समारंभ झाला, त्यावेळी मंत्री रावते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार, वेस्टर्न इंडीया ऑटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा आदी मान्यवर उपस्थित होते.मंत्री रावते म्हणाले की, अपघातामध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. दक्षिण भारतातील या राज्यांमध्ये अपघातांचे प्रमाण जास्त का आहे, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. तिर्थक्षेत्रांना जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. याचे कारण हा प्रवास रात्रीच्या वेळी केला जातो. दुचाकी वाहनांची संख्या जवळपास २ कोटी ७० लाख इतकी झाली आहे. रस्ते अपघातातील ७० टक्के अपघात हे दुचाकी वाहनांचे होतात. यात तरुणांची होणारी जिवीतहानी मोठी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.