टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 1 ते 31 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सामान्य रुग्णालय मालवणी मालाड येथे झाले, त्यावेळी सावंत बोलत होते.
कार्यक्रमात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ.सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ.साधना तायडे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ.पंकज चतुर्वेदी, इंडियन डेंटल असोसिएशनचे सचिव अशोक ठोबळे, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते.
सावंत पुढे म्हणाले, मौखिक आरोग्य तपासणी ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहीम आहे. तपासणी महिनाभर होणार असली तरी ही संपूर्ण तीन टप्प्यात चालणारी प्रक्रिया आहे. तपासणी नंतर निदान व उपचार असा हा कार्यक्रम असणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास हा एक संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल.
सर्वांत उत्तम संदेशदूत हे शालेय विद्यार्थी असतात. त्याच्या माध्यमातून ही मोहीम घराघरात पोहोचावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे सावंत म्हणाले.
तत्पूर्वी समुपदेशन पुस्तिका तसेच घडी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी तर आभार आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. सतिश पवार यांनी मानले.