मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळीत भरणार्या सोमवारच्या आठवडी बाजारात पोलिसांचा गणवेश विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा गणवेश म्हणजे आपलाच युनिफार्म आहे, असे समजून एका रिक्षाचालकाने तो विकत घेतला आणि रिक्षा चालवून या गणवेशाचा त्याने अनवधनाने अवमान केल्याची प्रकार घडला आहे. चालकाकडून चूकून या कपड्याची खरेदी झाल्याने त्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
विक्रोळीत राहणारे विजय ताम्हणकर यांना टागोर नगर परिसरात मोहम्मद इजहार (३१) हा रिक्षाचालक पोलिसाच्या दिसला. त्यांनी त्याची चौकशी केली.
सोमवारच्या आठवडी बाजारात पोलिसांचा गणवेश लिज्जत पापड कार्यालयासमोर दोनशे रुपयाला एका विक्रत्याकडून विकण्यात येत होता. या गणवेशाची शहानिशा न करता केवळ खाकी कपडे असल्यामुळे मोहम्मद याने तो विकत घेतला. असे आणखी गणवेश पोलिसांच्या चिन्हासह विक्रत्याकडे होते, अशी माहिती त्याने दिली.
रस्त्यावर पोलिसांच्या गणवेशाची विक्री होणे, ही गंभीर बाब आहे. याचा गैरवापर होऊ शकतो. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी दिशा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश बैरीशेट्टी यांनी केली आहे. तर या प्रकरणाचा तपास करू, असे विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर हंसाटे म्हणाले.