डोंबिवली : उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाच्या डोळेझाकपणाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मुजोर रिक्षाचालकांनी स्वंयघोषित भाडेवाढ केल्याने प्रवाशी व रिक्षाचालकांमध्ये वाद सुरु झाला आहे. लवकर यावर तोडगा न निघाल्यास प्रवाशी व रिक्षाचालकांमध्ये हाणामारीत होण्याची शक्यता नाकरता येत नाही. रिक्षा चालक–मालक संघाने पश्चिमेकडील स्टेशनसमोर लावलेला दरवाढीचा फलक काढून टाकावे अशी ओरड सुरु झाली आहे.डोंबिवलीत रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असून याला रिक्षा युनियन खतपाणी घालत आहे. रिक्षाचालकांनी कोणतीही परवानगी न घेता केलेल्या भाडेवाढीसंदर्भात रिक्षा युनियनने शांततेची भूमिका निभावली आहे. तर दुसरीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांनीही यावर कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिमेकडील स्टेशनसमोरील तृप्ती हॉटेलसमोर एका रिक्षा थांब्यावर रिक्षाचालकांनी २ रुपये भाडेवाढ केल्याचे फलक लावले होते. त्यावेळी रिक्षा युनियन, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाने शांत रहाणे पसंत केले. आता पुन्हा रिक्षा थांब्यावर २ रुपये भाडेवाढ केल्याचे फलक लावले आहे. शेअर पद्धतीने चौथी बसवूनही रिक्षा प्रवाश्यांना आर्थिक व्यथेचे भांडवल करून दरवाढ द्यावी याला प्रवाश्यांची हरकत आहे. दरवाढ सुमारे २५ क्के असून ही फलकबाजी मान्य नसल्याने रिक्षाचालक आणि प्रवाश्यांमध्ये वाद सुरु होत आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी ससाणे यांना संपर्क केला असता अशा प्रकारची कोणतीही भाडेवाढ झाली नसून सदर फलक महानगरपालिकेला काढण्यास सांगण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, भाडेवाढ संदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभागाने लवकरात योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.