डोंबिवली : पावसाळ्यात डोंबिवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती दयनिय झाली असून डांबरी रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. पश्चिमकडील जुनी डोंबिवली विभागातील स्टेशन रोड पूर्णपणे खड्ड्यांनी व्यापून गेला असून तेथून प्रवास करणे तारेवरची कसरत होत आहे. पालिका प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही. अखेर या रस्त्यावरून नेहमी रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांनी खड्डे बुजविण्याचे काम केले. ही तात्पुरती मलमपट्टी असून रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे भरले जातील का अशी विचारणा येथील नागरिक करीत आहेत.
पश्चिमेकडील जुनी डोंबिवली रस्त्याच्या मार्गक्रमणात येथील चार नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावरून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौर विनिता राणे सतत ये-जा करीत असतात. रस्त्यातील खड्ड्याबाबत त्यांना चांगली जाणीव असूनही खड्डे बुजविले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. जुनी डोंबिवली खड्डेमय रोडची सुरूवात जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड, जोंधळे शाळा, रामकृष्ण बाजार, देवीचौक, समर्थ आयुर्वेदिक भांडार, सहयोग कॉर्नर, कामत बिल्डिंग, शिवमंदिर, डॉ. नेमाडे गल्ली, जुनी डोंबिवली चौक मार्गे जुनी डोंबिवली गांव गिरजामाता मंदिर, वैभव हॉल आणि ठाकूरवाडी असा सुमारे दोन कि.मी. रस्ता असून सर्वच रस्ता खड्डेमय झाला आहे. रस्त्यावर नेहमी पाण्याची पाईप लाईन, इलेक्ट्रिक केबल, टेलिफोन केबल, नळ जोडणी आणि गटारांच्या खोदकामामुळे रस्ते खोदले जातात. संपूर्ण मे महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाळ्यात या रस्त्यात खड्डे बुजविण्याचे काम पालिका प्रशासनाने केले. पण दोन दिवसातच त्या संपूर्ण रस्त्याची चाळण झाली. निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केले असले तरी पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे डोळे केल्याची वस्तुस्थित उघड झाली आहे.
जुनी डोंबिवली रस्त्याची झालेली चाळण तेथील व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना त्रासदायक होत असून अखेर त्यांनी रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतून काही प्रमाणात खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. या सामाजिक खड्डे बुजविण्याच्या कामासाठी स्वतः डोक्यावरून माती, पेवर ब्लॉक, दगड आणून खड्डे बुजविले. जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड अध्यक्ष विलास पंडित, अरविंद कोचरेकर, प्रकाश गणकर, प्रकाश बागवे, मॅक्सी शिरोडकर, दिपक मुळे, सुरेश गायकवाड, अॅलेक्स फर्नांडीस यांनी विशेष मेहनत घेतली.