रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाच्या जाहिरात बोर्डाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काळे फासले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले. यावेळी केंद्र सरकार व रिफायनरीविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी यशवंतराव यांच्यासह 10 जणांना आज अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केलं असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मनाई आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई झाली.
निवडणुकीपूर्वीच रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण आता पुन्हा तापू लागलं आहे. राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. येथील वातावरण तणाव आहे. असे असतानाच राजापूर रेल्वे स्टेशन येथे रिफायनरीचे समर्थन करणारा फलक लावण्यात आला होता. ही बाब लक्षात येताच राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी या फलकाला काळे फासून केंद्र सरकार व रिफायनरी विरोधात घोषणा दिल्या होत्या.
जिल्ह्यात मनाई आदेश असताना देखील या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अजित यशवंतराव, प्रतिक मठकर, बाळा चव्हाण, एकनाथ लाड, अभिजित राजेशिर्के, बंड्या शिंदे, श्रीधर सौदळकर, मनीष लिंगायत, भागोजी कोरगावकर यांच्यासह 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आज अजित यशवंतराव यांच्यासह 10 जणांना अटक केली. त्यानंतर या सर्वांना न्यायालयात हजर केलं असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.