
रत्नागिरी:राजापूर तालुक्यातील नाणार पंचक्रोशीत प्रस्तावित असणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जनमानस अधिक तीव्र होऊ लागला आहे. महिलाही या प्रकल्पाच्या विरोधात गावागावात जनजागृती करणार आहेत. त्यामुळे हा लढा आता आणखीनच बुलंद होणार आहे.प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला गेल्या काही माहिन्यांपासून विरोध वाढू लागला आहे. भाजप सोडल्यास प्रत्येक पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात उभा ठाकला आहे. त्यातच जनआंदोलनामध्ये महिलांची भूमिकाही महत्वाची ठरली आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या जमिनीवर प्रकल्प होऊ नये यासाठी इथला प्रत्येक नागरिक झगडतो आहे. पण दलालांच्या माध्यमातून जिल्ह्याबाहेरील अनेक लोकांनी इथल्या जमिनी यापूर्वी विकत घेतल्या आहेत. 2 हजार एकरहून अधिक जमिनीचे व्यवहार झाले आहेत. अनेकांना याचा मोबदलाहि मिळालेला नाही. आपल्याला फसवून जमिन विकत घेतल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. मात्र यापुढे असं होऊ नये यासाठी आता नारी शक्ती एकवटणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जमिनी विकू नका असं आवाहन या महिला प्रत्येक गावात जाऊन करणार आहेत. 17 गावांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे.या प्रकल्पाचे दुष्परिणाम जनतेला सांगण्यात येणार आहेत. तसेच प्रशासनाकडून कोणीही या प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती देण्यास आलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन
करण्यात येणार आहे आणि मुख्य म्हणजे या जनजागृतीच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या विरोधात सर्व महिलांना एकत्र आणणार असल्याची माहिती भूमीकन्या एकता मंच, सागवेच्या सेक्रेटरी सोनाली टुकरुल यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात आझाद मैदानात झालेल्या रिफायनरी आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी या प्रकल्पाबाबत आश्वासन दिलं असलं, तरीसुद्धा जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल, असही सोनाली टुकरुल यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात आता नारीशक्ती एकत्र आल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन तीव्र होणार असल्याचे दिसून येते.














