रत्नागिरी : राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सध्या निवडणूक लागली असून कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणार आहे. तशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी जाहीर केली आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावीत असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने अलीकडेच एक करार केला आहे. इथल्या जनतेचा या प्रकल्पाला प्रखर विरोध असतानाही भाजप सरकार हे पाऊल उचलत असल्याने जनतेत असंतोष आहे. त्यामुळेच आता भाजपच्या विरोधात इथलं जनमत गेलं असून सध्या राजापूर नगराध्यक्ष पदाची निवडणूकित भा.ज.प.उमेदवाराच्या विरोधात उतरून प्रचार करणे आणि भा.ज.प.च्या उमेदवारास पाडण्याचं कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने ठरवलं आहे. तसेच यापुढे महाराष्ट्रात जेथे जेथे ज्या ज्या निवडणूका होतील तिथे तिथे जाऊन भा.ज.प.विरोधात प्रचार करून भा.ज.प.विरोधात असलेल्या उमेदवारास सर्वतोपरी मदत करणे. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जावून सरकार कडून त्रस्त,दु:खी असलेले शेतकरी व इतर संघटना यांच्या गाठीभेटी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटन तर्फे, संपर्क अभियान मार्फत घेण्याचे चालू केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत हे भाजप वाले कसे खोटे बोलून जेनतेला फसवतात ते लोकांपर्यंत तोंडी तसेच लेखी पत्रकांच्या माध्यमातून पोहचून पटवून देणार असल्याचं अशोक वालम यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान फसव्या भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका. अन्यथा भविष्यात तुमच्या पदरीही फसवणूकी शिवाय काहीच मिळणार नाही अशी विनंती जनतेला करण्यात आली आहे.