नागपूर : निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांना आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. मात्र, समाजातील नागरिक स्वतःहून आर्थिक मदत करून उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतात, असे आजच्या काळात दुर्मिळ झाले आहे. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल खोब्रागडे यांच्या बाबतीत हा अपवाद खरा ठरला आहे. नॉर्थ नागपूर सिनिअर सिटीझन फोरमच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोब्रागडे यांना निवडणुकीसाठी एका महिन्याचे निवृत्त वेतन दिले असून समाजाने अशा नव्या नेतृत्वाला मोकळ्या हाताने मदत करावी, असे आवाहन केले आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही अनेक वर्षांपासून उत्तर नागपूरमध्ये राहतो. आता निवृत्त झालो असलो तरी या भागाचे चित्र काहीसे तस्सेच आहे. येथील विकास केवळ कागदावर असल्याचे जाणवते. मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा, नोकरीच्या संधी, चांगल्या आरोग्य सुविधा यांसाठी आजही संघर्ष करावा लागतो.”
तीन वर्षांपूर्वी युवा ग्रॅज्यूएट फोरमच्या संपर्कात आल्यानंतर सामाजिक कार्याची संधी मिळाली. अतुल खोब्रागडे यांच्या नेतृत्वात उत्तर नागपूरच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक कामे झाली आहेत. कंन्व्हेंशन सेंटर, पाटणकर उद्यान, बर्डी मुख्य मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, इंदोरा मेट्रो स्टेशन आदी सुविधांच्या उभारणीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मते, अतुल खोब्रागडे यांचा प्रामाणिकपणा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा, आणि प्रशासनातून कामे करवून घेण्याची शैली अतिशय प्रेरणादायी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अशा समर्पित कार्यकर्त्यासोबत आम्ही सर्वजण उभे आहोत, असे त्यांनी ठामपणे व्यक्त केले आहे.