
फळे पिकविण्याच्या शास्त्रीय पद्धतींबाबत जनजागृती करण्याचे आवाहन
मुंबई, दिनांक 18 नोव्हेंबर :- कृत्रिमरीत्या फळे व भाज्या पिकविण्यासाठी व नियमबाह्य पद्धतींचा वापर रोखण्यासाठी तपासणी अधिक कडक करण्यात यावी तसेच अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
यासंदर्भात सहकार व पणन विभागाच्या अखत्यारीतील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या फळ व्यापार्यांना फळे पिकविण्याच्या शास्त्रीय पद्धतींबाबत कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन व जनजागृती करण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी दिले.
आज मुंबई मंत्रालयात श्री. झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील, सहसचिव रा. को. धनावडे तसेच सहकार व पणन विभागाच्या उपसचिव सौ. माधवी शिंदे उपस्थित होते.
बैठकीत विभागाकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर रसायने किंवा गॅस वापरून फळे कृत्रिमरीत्या पिकविण्याचे प्रकार आढळल्यास अन्न सुरक्षा मानके कायदा (FSSAI) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान आंबा, केळी आणि इतर फळांचे एकूण १२८ नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यापैकी १०४ नमुने प्रमाणित घोषित झाले आहेत. २४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
अन्न सुरक्षा मानके (Prohibition & Restrictions on Sale) नियम २०११ मधील नियमन 2.3.5 नुसार फळे कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी कार्बाईड गॅसचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे. ऑगस्ट २०१६ मधील दुरुस्तीनुसार १०० PPM तीव्रतेपर्यंत इथिलिन गॅसचा वापर करण्यास मर्यादित परवानगी देण्यात आली आहे.
यावेळी विभागाचे सहायक आयुक्त श्री. महाले, कक्ष अधिकारी, अजित जगताप उपस्थित होते.















