
रत्नागिरी : अटकेत असलेल्या रिफायनरीविरोधी आंदोलकांची पोलिसांनी मुक्तता करावी या मागणीसाठी मंगळवारी शिवणेखुर्दमधील ग्रामस्थांनी निषेध रॅली काढली. आमची मागणी मान्य करा.. अमोल बोळेला मुक्त करा, एकच जिद्द रिफायनरी रद्द.. जमीन आमच्या हक्काची.. अशा जोरदार घोषणा देत मंगळवारी शिवणेखुर्द परिसरातील ग्रामस्थांनी गावात रॅली काढली. यावेळी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आंदोलकांना तत्काळ मुक्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात पस्तावित असलेल्या रिफायनरी पकल्पाच्या विरोधात धोपेश्वर, गोवळ, शिवणे परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षण सुरू झाल्यापासून आंदोलक वेगवेगळ्या मार्गाने आपला विरोध दर्शवित आहेत. तर माती परीक्षणाच्या कामाला अडथळा होवू नये याकरीता प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून या परिसरात मनाई आदेश जारी केले आहेत. तीन ते चार दिवसांपूर्वी रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अमोल बोळे यांच्यासह अन्य काही आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करावी, तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी सोमवारी गोवळ येथील नवलादेवी मंदिर परिसरात लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी शिवणे खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी गावात निषेध रॅली काढत रिफायनरी हटविण्यासोबतच अटक केलेल्या आंदोलकांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली. या रॅलीलीमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.