रत्नागिरी (आरकेजी) : रिफायनरी विरोधातील लढा आपण अहिंसेच्या मार्गानेच लढूया, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका आणि आंदोलनकर्त्या उल्का महाजन यांनी राजापूरवासीयांना केले. यावेळी त्यांनी अनेक आंदोलनांविषयीचे आपले अनुभव नाणार रिफायनरी विरोधातील मेळाव्यात व्यक्त केले. मेळाव्याला हजारोंच्या संख्येने चाकरमान्यांसह ग्रामस्थानी हजेरी लावली.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जगातील सर्वात मोठ्या ग्रीन रिफायनरी विरोधात वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. नुकतंचं मुंबईत आझाद इथं या रिफायनरी विरोधात भव्य आंदोलन झालं. त्यापाठोपाठ आज राजापूर सागवे- कात्रादेवीमध्ये मध्येही या रिफायनरी विरोधात भव्य मेळावा झाला. मुंबईकर आणि ग्रामस्थ असा हा संयुक्त मेळावा झाला. हजारो लोक या मेळाव्याला उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जमिनी या प्रकपासाठी द्यायच्या नाहीत. जमिनीची मोजणी कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायची नाही असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. जवळपास सहा हजारांहून अधिक लोकांनी या मेळाव्याला उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी अशोक वालम,उल्का महाजन यांच्यासह राजन राजे,भाई सामंत व्यासपीठावर उपस्थित होते.