रत्नागिरी (आरकेजी) : रिफायनरीसाठी कोकण नाही अशी हाक देत कोकणात हा प्रकल्प नको असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.रत्नागिरी येथे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यावेळी ते बोलत होते.
रिफायनरी गुजरातमध्ये नेऊ असं मुख्यमंत्री ठामपणे सांगतात. प्रकल्प कुठेही न्या, पण इथे नको पंतप्रधानांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री वाट्टेल ते बोललात. प्रकल्प न्यायचा असेल तर अन्य राज्यात कुठेही न्या गुजरातच कशाला हवं असं टोला त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना हाणला. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या विधानाची खिल्ली उडवताना ते म्हणाले की नाणार प्रकल्प विदर्भात न्या, पण समुद्र न्यायचा कसा असा टोला त्यांनी यावेळी लगावला. अधिसूचना रद्द झालेली नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खोटं बोलतात हे नाणार प्रकल्प पुढे रेटवन्यावरून दिसून येतं. आतून सगळे एक आहेत हे नाणार प्रकल्पावरूनच समजते. ज्यांनी निवडून दिलंय त्यांच्यापुढे विद्यमान आमदार, खासदार खोटं बोलतात, त्यामुळे पुढचा राजापूरचा आमदार मनसेचा होईल हे लोकांनी ठरवायचं आहे. दरम्यान ते पुढे म्हणाले कि कोकणासारखी सुपीक जमीन देशात कुठेच मिळणार नाही.येथील फळे, जेवण आणि बुद्धिवाद अन्यत्र नाही. कोकणात मोठे झालेल्या माणसांची यादी देशात कुठेच नाही. 4 भारतरत्न हे कोकणातलेच आहेत. एवढं सगळं असतानाही जागा विकून तुम्ही करणार काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझा विकासाला विरोध नाही पण रिफायनरीची कोकणात गरज नाही, हा प्रकल्प दुसरीकडे कुठेही न्या असे त्यांनी ठणकावलं. केरळसारखं पर्यटन देशात कुठेच नाही, इथेही हे शक्य आहे. पण इथे जो तो येतो तो म्हणतो मी विदर्भाचा, मी मराठवाड्याचा, मी पश्चिम महाराष्ट्राचा, असं म्हणून कसं चालेल. विकास सर्वसमावेशक असला पाहिजे. मुंबई गोवा महामार्गाचं काम आघाडी सरकारच्या काळापासून सुरु आहे. आता पाऊस जवळ आला आहे, त्यामुळे आता सुरु असलेल्या कामाची काय अवस्था आहे, दरडी कोसळतील तेव्हा काय परिस्थिती होईल. चायनामध्ये काही काळात रस्ते पूर्ण होतात, मात्र आपल्याकडे वेळकाढू कंत्राटदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी प्रयत्न होतात, मग विकास कसा होईल, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. सध्या भाजप विरोधात कर्नाटक सर्व पक्ष एकत्र आले यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले, सर्वांनी एकत्र यायचा घेअर सर्वप्रथम मी टाकला. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहन केले होते आणि तिथून हि प्रोसेस सुरु झाली, यामध्ये मनसे जिथे असायची तिथे असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.