रत्नागिरी (आरकेजी): राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधाची धार आता तीव्र झाली आहे. त्यातच शिवसेनाही या प्रकल्पाबाबत आक्रमक झालेली आहे. दरम्यान प्रकल्पासंदर्भात मुंबईत उद्या वेगवेगळ्या ठिकाणी दोन सभा होणार आहेत.
मुंबईच्या शिरोडकर हॉलमध्ये सायंकाळी साडेचार वाजता मुंबईवासीय प्रकल्प विरोधकांची एक सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे राजापूर तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला संभ्रमावस्थेमुळे दुटप्पीपणाचा आरोप झालेली शिवसेना आता पुन्हा एकदा आक्रमक झालेली असून पुढील आंदोलनाची दिशा या सभेत ठरणार आहे.
तर दुसरी सभा धुरू सभागृह, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय पर्यावरण चळवळीने हि सभा आयोजित केली असून नामवंत वक्ते या सभेला मार्गदर्शन करणार आहे.
तापमानवाढीमुळे मानवजातीचे पृथ्वीवरून उच्चाटन होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे पॅरिस करार व इतर वैज्ञानिक परिषदा कार्बनचे उत्सर्जन थांबवणे आवश्यक असल्याचा गंभीर इशारा देत आहेत. तरीही उरलेल्या जैविक विविधतेचा खजिना असलेल्या निसर्गसंपन्न कोकणात राजापूरला प्रचंड तेल शुध्दीकरण + कोळसा जाळून वीजनिर्मिती करणारे विद्युत केंद्र + रसायन + प्लास्टिक निर्माण संकुल सर्व बाधित गावांच्या पूर्ण विरोधाचा अनादर करून आणण्यात येत आहे.
याचा शेतीमधील संकटाशी संबंध आहे. ही विनाशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी विचारी माणसांना आवाहन करणारी हि जाहीर सभा आहे. र. ग. कर्णिक, प्रा. एच एम देसरडा, काळूरामकाका दोधडे, मा. न्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील, खासदार अरविंद सावंत, डाॅ. शशीकुमार मेनन, सुश्री मधुकांता दोशी, रमाकांत पाठक -चरखा हातमागाचे प्रचारक, स्टालीन- मेट्रोपासुन आरे जंगल रक्षण, बाबूजी ढगे- विदर्भातील शेतकरी: तेथील भयंकर स्थितीबाबत, विक्रांत कर्णिक – उद्योग क्षेत्र त्यागून तापमानवाढीबाबत जागृती, कुंदन राऊत- तापमानवाढीमुळे जागृती, हे सर्व वक्ते या सभेला मार्गदर्शन करणार आहेत.