रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि परिसरातील जमिनींच्या व्यवहारासाठी सध्या दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. राजापुरात त्यांना अटकाव झाल्यानंतर आता त्यांनी आपले बस्तान रत्नागिरीत हलवले आहे. मात्र, रत्नागिरीत असे व्यवहार होत असतील तर ते उधळून लावू, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा, अडचणींचा फायदा उचलून काही दलाल कमी दराने जागा खरेदी करत आहेत. काही ठिकाणी टोकन रक्कम देऊन जागा अडवल्या जात आहेत. यातून करोडोंची उलाढाल होत आहे. दलालांचा हा डाव उघड झाल्याने राजापुरात राहून त्यांना जागेचे व्यवहार करणे अवघड जात आहे. त्यामुळे या दलालांनी रत्नागिरीत आपले बस्तान हलवले असून, आता येथूनच जमिनीचे व्यवहार होत आहेत. काही धनाढ्यांनी तर शेकडो एकर जमीन खरेदी केली आहे. गरीब शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. त्यांनी जमीन विकू नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नाणार आणि परिसरातील जमिनीचे व्यवहार रत्नारिीत होत असतील तर याची माहिती नागरिकांनी आम्हाला द्यावी, असे आवाहनही आचरेकर यांनी केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत शहरप्रमुख अशोक वाडेकर आणि नंदू चव्हाण उपस्थित होते.