रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या सभेनंतर खळखट्याक सुरु झालेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचा विरोध एवढा तीव्र झालाय कि जनताच आता हा प्रकल्प हटविण्यासाठी इरेला पेटली आहे. त्याचच उदाहरण रविवारी कुंभवडेत पाहायला मिळालं. पण काल सभेत झालेल्या दलाल मारहाणी प्रकरणानंतर आज कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना मुंबईच्या अध्यक्षासह त्यांच्या पत्नीला राहत्या घरातून नाटे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राजापूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे.
कुंभवडेमध्ये काल या प्रकल्पबाबत सभा होती. दलाल आंबेरकर याने दादागिरी करत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित जमावाने त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर परस्पर विरोधी तक्रारी दाखल नाटे पोलिसांत दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान नाणार परिसरात जमावबंदी आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आलेला आहे. मात्र तरीसुद्धा सभा घेऊन जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तसेच मारहाण प्रकरणी नाटे पोलिसांनी अध्यक्ष अशोक वालम आणि त्यांच्या पत्नी यांना पडवे येथील राहत्या घरातून आज सकाळी 7 च्या सुमारास अटक केली. हि बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राजापूर तालुक्यात पसरली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे. दरम्यान खबरदारी म्हणून पोलिसांनी वालम दांपत्याला दुपारपर्यंत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ठेवलं होतं. त्यानंतर त्यांना राजापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पण वालम यांच्या अटकेमुळे संपूर्ण राजापूरमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे.