मुंबई : कोकणात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. पर्यावरण व आरोग्याला या प्रकल्पामुळे धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे असे हानिकारक प्रकल्प कोकणातून हद्दपार करा, अशी मागणी करताना प्रकल्पाला राजापूरवासियांचा प्रखर विरोध राहील, असा इशारा अशोक वालम व रामचंद्र भडेकर यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या जैतापूर प्रकल्पानंतर आता रिफायनरी प्रकल्पही वादात सापडणार आहे.
राजापूर तालुक्यातील सागवे नाणार परिसराला औद्योगिक क्षेत्र घोषित करून जगातील सर्वात मोठी रिफायनरी प्रस्तावित केली आहे. रिफायनरी बरोबर पेट्रो केमिकल कॉम्प्लेक्स, प्लास्टिक कॉम्प्लेक्स, कोळशावर आधारित औष्णीक ऊर्जा प्रकल्प, इत्यादी प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राला तसेच रिफायनरीला स्थानिक व परिसरातील ग्रामस्थांचा विरोध आहे. तरीही शासनाने भूसंपादनाच्या नोटीसा पाठवल्या आहेत. १२ सप्टेंबरला याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला जनतेला गाफील ठेवणाऱ्या समित्यांचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. प्रकल्पग्रस्तांनी कोणतीही समिती नेमलेली नाही. रिफायनरी प्रकल्प रद्द करावा म्हणून नाणार, साखर, सागवे, कुंभवडे, तारळ इत्यादी ग्रामसभांनी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव मंजूर केले आहेत. याची दखल राज्य सरकारने व मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.