रत्नागिरी (आरकेजी) : रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूरवासियांनी दहिहंडी फोडून निषेध व्यक्त केला. राज्यात दहिहंडीचा थरार असताना राजापूरमध्ये रिफायनरी हटवा, कोकण वाचवा अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. जिल्यात प्रथमच निषेधाची हंडी फोडण्यात आली.पडवे गावात दरवर्षी जय श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे दहीहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. पण सध्या इथलं वातावरण वेगळं आहे. पडवे गावासह राजापूर तालुक्यातील १४ गावांमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. पण या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध किती तीव्र आहे हे पडवे मधील दहीहंडी उत्सवात दिसून आलं. रिफायनरी विरोधी पोस्टर्स ठिकठिकाणी झळकत होते. रिफायनरी हटवा, कोकण हटवा अशा मजकूरांसह आमचा रिफायनरीला विरोध का आहे हे सांगणारे पोस्टर्स झळकत होते. तसेच पोवाड्याच्या माध्यमातून या प्रकल्पाविरोधात जनजागृती करण्यात येत होती. त्यामुळे इथं फुटणारी दहीहंडी यावर्षी रिफायनरी प्रकल्प विरोधी दहीहंडी म्हणून फोडण्यात आली.















