
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाली आहे. मात्र, हा प्रकल्प याच ठिकाणी व्हावा याच्या समर्थनासाठी शनिवारी कोकण विकास समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये शेतकरी, महिला, तरुण, राजापूरमधील ग्रामस्थ , उद्योजक, व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. याशिवाय अनेक संस्थांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला होता. त्यांचे सभासदही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. हा प्रकल्प ज्या भागात होणार आहे त्या नाणार परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ देखील या समर्थन मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होते. याशिवाय राजापूर, लांजा, रत्नागिरी या भागातील ग्रामस्थ, व्यापारी, तरुण मोर्चासाठी आले होते.
‘चला असत्याकडून सत्याकडे’, ‘आता नाही तर कधीच नाही’ येईल जेव्हा रिफायनरी, संपून जाईल बेरोजगारी, कोकण रिफायनरी झालीच पाहिजे.. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.., असे फलक घेऊन व घोषणा देत या मोर्चाला मारुती मंदिर येथून सुरुवात झाली. राजापूरमधील स्थानिकही या मोर्चात आपल्या जमिनीचा सात-बारा हाती घेवून सहभागी झाले होते. या मोर्चावर माळनाका येथे पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. मोर्चा माळनाका सिव्हिल हॉस्पिटल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी हजारो मोर्चेकरी एकत्र आले. त्यानंतर प्रकल्प समर्थकांच्यावतीने उप-जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
या प्रकल्पामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार असून स्थानिक शेतकरी देखील या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. त्यामुळे नाणार येथे हा प्रकल्प व्हावा, अशी जनतेची भावना आहे. ही भावना मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचवावी व मुख्यमंत्र्यांकडे आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. हा मोर्चा शांततेत निघावा यासाठी पोलिसांनी अनेक अटी घातल्या होत्या. त्या अटींचे पालन करून हा मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला.
विविध संघटनांचा सहभाग, व्यापाऱ्यांचा बंद, भाजपचाही पाठींबा
रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती. त्यालाही रत्नागिरी शहरातल्या व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदला रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील गोखले नाका, धनजी नाका आणि राम आळी परिसरातील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. तर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी थेट रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. मात्र या आहवानाला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
दरम्यान या मोर्चामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
















