
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात जी रिफायनरी प्रस्तावित केली होती, ती रद्द झाली असून, पुन्हा नाणार परिसरात ती रिफायनरी येऊच शकत नाही. म्हणून आमच्यादृष्टीने हा विषय आता संपलेला आहे. गुंतवणुकदारांची दलाली करणारे प्रमोद जठार व इतर काही त्यांचे साथीदार यांनी कितीही तांडवनृत्य केले, तरी आम्ही हा प्रदूषणकारी रेड रिफायनरी प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत इकडे येऊ देणार नाही. ८ हजार एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी संमती देण्याबाबत प्रमोद जठार व इतर दलाल मंडळी जे शेतकऱ्यांच्या समर्थनाचे खोटे पुरावे देत आहेत, ते एकदा तोंडावर पडले आहेत, पण यापुढे कशावर पडतील ते देवच जाणे. आमचा विरोध हा जेवढा पूर्वी होता, त्याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आता असून, आम्ही ही रिफायनरी नाणार परिसरातच नव्हे, तर कोकणात कुठेही होऊ देणार नाही, असा इशारा कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
नाणार येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प येथील तीव्र विरोधामुळे रायगड जिल्ह्यात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, हा प्रकल्प नाणार येथेच होण्यासाठी नाणार परिसरातील १४ गावांमधील ८ हजार एकरांवरील जमीन मालकांनी संमती दिली असून, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी नोटरीही केली आहे. तसेच ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती सिंधुदुर्गचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी अलिकडेच कणकवलीतील पत्रकार परिषदेत दिली होती. या पार्श्वभूमीवर कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे तथा कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी एक पत्रक प्रसिध्द केले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, या रिफायनरीपासून होणारे प्रदूषण, निसर्गाचा, पर्यावरणाचा, जैवविविधतेचा होणारा नाश, जागतिक तापमानवाढीला कारणीभूत असून, हे सर्व आम्ही अभ्यासपूर्वक पाहिले आहे. त्यामुळे आता कोणीही कितीही फुशारक्या मारल्या, तरी ही रिफायनरी कोकणात होऊ शकत नाही. त्याला दुसरे कारण म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला याआधीच जाहीररीत्या सांगितले आहे की, ‘कोकणची राख करून गुजरातला रांगोळी घालायला देणार नाही’ आणि ते आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. हे जमीन गुंतवणूकदारांचे लाचार दलाल फक्त त्या गुजराती, मारवाड्यांना काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण तेच जमीन गुंतवणूकदार आता या दलालांच्या उरावर बसायला लागले आहेत. हे प्रमोद जठार त्यांच्या सोबत असलेल्या दलालांच्या साथीने जमीन गुंतवणूकदारांची अशा खोट्या बातम्या देवून मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांनी थांबवावे, अन्यथा कोकणातील जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. रिफायनरीच्या समर्थनासाठी तुम्ही लोकसभेला दिलेला छुपा उमेदवार ‘रिफायनरीचा चौकीदार’ त्याला दोन्ही जिल्ह्यातून किती मते मिळाली, हे लक्षात असूदे. तसेच प्रमोद जठार व दलाल मंडळींनी पुन्हा जर नाणार परिसराच्या बाबतीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला, तर येथील महिला संघटना जी ‘कोकण भूमिकन्या महामंडळ’ नावाने स्थापन झालेली आहे, ती यापुढे यांना चांगला धडा शिकवेल. रोजगाराच्या नावाखाली प्रदूषणकारी, विनाशकारी रिफायनरी आणण्यापेक्षा सत्ता त्यांच्याच पक्षाची असल्याने, कोकणातील उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे त्यानी आणून दाखवावेत. यांना रिफायनरीच्या माध्यमातून मोठी दलाली करायला मिळणार होती व रिफायनरीत कॉंट्रॅक्ट मिळण्याची स्वप्ने पडू लागली होती. ती थांबल्याने यांचा जीव कासावीस होऊ लागला असल्याचे अशोक वालम यांनी म्हटले आहे.















