रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रकल्पाविरोधात शिवसेना आणि शेतकरी-मच्छिमार रिफायनरी विरोधी समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट रोजी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
कोकणातल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. पावसाळी अधिवेशनातहि हा मुद्द्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेनेलाही विरोधकांनी यावरून लक्ष केलं होतं. दरम्यान शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात ठाम आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हट्टीपणाने हा प्रकल्प कोकणच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे आम्ही कधीही होऊ देणार नसल्याचं सांगत हा विरोध अधिक तीव्र करण्यासाठी लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि स्थानिक प्रकल्प विरोधी समितीकडून कुवारबाव ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.