
रत्नागिरी : सध्याच्या स्पर्धात्मक युगात सहकार क्षेत्र अधिक सक्षम करणे गरजेचे असून, यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सभासद संस्थांच्या पदाधिकारी आणि सदस्यांसाठी एका निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील नामांकित डॉ. विठ्ठलराव विखेपाटील प्रबंध संस्थेच्या माध्यमातून, कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे दि. ३१ जुलै २०२६ ते दि. ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण पार पडणार आहे. यामध्ये सहकार कायदा, वित्तीय व्यवस्थापन, संचालक मंडळाची कार्यपद्धती आणि लेखापरिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील बँकेचे क्षेत्रीय कार्यालय किंवा प्रधान कार्यालयातील प्रशासन विभाग, रत्नागिरी येथे संपर्क साधून दि. २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.














