रत्नागिरी : गावाचा विकास होण्यासाठी जुन्या रुढी-परंपरांकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेच असल्याचे मत राज्याचे गृहनिर्माणव उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी व्यक्त केले. ते महाडिकवाडी, शिव खुर्द, ता. खेड येथे डोंगरी विकास कार्यक्रम २०१५-१६ अंतर्गत बांधण्यात आलेल्या समाज मंदीर उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी खेड च्या सभापती बेलोसे, सचीन कदम, खेड तहसिलदार ,गटविकास अधिकारी पाडसे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गावित , सरंपच योगीता डफळे, बेलोसे, विठोबा महाडिक, दत्ताराम गोठळ, ग्रामसेवक भोरजे उपस्थित होते.
वायकर म्हणाले की सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात जिल्हा नियोजन समिती मधील मंजूर निधीतून गावागावातून विहिर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गेल्या वित्तीय वर्षात १२४ कोटी एवढा निधी गावातून तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर करण्यात आला आहे. तसेच यावर्षी गावागावातील खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाडिक वाडी, शिव खु. च्या इतर विकास कामांसाठी २५ लाख एवढा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.तसेच महाडिक वाडी, शिव खुर्द येथील शहीद जवान बाळकृष्ण भागोजी महाडिक यांच्या पत्नी सुनंदा बाळकृष्ण महाडिक यांचा पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. तत्पुर्वी पाटीलवाडी, शिव खुर्द येथील अंगणवाडी बांधकामाचे भूमिपुजन पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते झाले.