रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) – शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी राज्यमंत्री रविंद्र माने हे पुन्हा शिवसेनेमध्ये परतले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “मातोश्री” वर शिवबंधन बांधून व हाती भगवा घेऊन माने यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
जिल्हा पारुषदेच्या निवडणुकांपासून रवींद्र माने यांचा शिवसेना प्रवेश चर्चेत होता. रवींद्र माने 1990 साली संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1995 साली ते पुन्हा निवडून आले. त्यावेळी राज्यात युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र माने यांची नगरविकास राज्यमंत्री म्हणून निवड झाली. रत्नागिरीचे पालकमंत्रीपदही त्यावेळी त्यांना देण्यात आले. त्यानंतर 1999 च्या विधानसभा निवडणूकीत माने तिसऱ्यांदा विजयी झाले. यावेळी सुभाष बने यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर 2004 मध्ये मात्र सुभाष बने यांना शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट मिळालं आणि तेव्हापासून नाराज असलेल्या रवींद्र माने यांनी अखेर 2007 मध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
गेले वर्षभर मात्र रवींद्र माने शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. अखेर आज रवींद्र माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.