सिंधुदुर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. तद्वतच राज्य शासनानेही विविध विकास योजना कार्यान्वित केल्या आहेत. या विकास योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य लोकप्रतिनीधी व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयाने करावे असे आवाहन बंदरे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
वेंगुर्ला कॅम्प येथे आयोजित समारंभात वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मल्टीपर्पज सभागृह व शॉपिंग कॉम्पलेक्स इमारतीचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा आस्मिता राऊळ, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर, अतुल रावराणे, प्रसन्न कुबल, स्नेहा कुबल, सुमन निकम, नागेश गावडे आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेस राज्य व केंद्र शासनामार्फत विविध विकास योजनांसाठी निधी प्राप्त होत असतो. याचा विनीयोग विहीत वेळेत व मंजूर विकास कामांवर खर्च होईल याकडे प्रशासना बरोबरच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. असे सांगून चव्हाण म्हणाले की, नगरसेवकांनी प्रत्यके प्रभाग निहाय विकास योजनांची तसेच वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या माहिती देण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न करावेत.
प्रारंभी प्रास्ताविकात मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या मल्टीपर्पज इमारतीमुळे वेंगुर्ला शहराच्या वैभवात भर पडणार असून समांतर बाजापेठ उभी राहण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगून ते म्हणाले सहा कोटी ३७ लक्ष रुपयांचा हा प्रकल्प असून तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नगराध्यक्ष राजन गिरप यांनी शासनाने वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल यावेळी आभार व्यक्त केले. शेवटी प्रशांत आपटे यांनी आभार मानले. समारंभात वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगरसेवक व वेंगुर्ला शहरातील नागरिक उपस्थित होते.