
रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या मिऱ्या समुद्रात एक मच्छिमारी बोट बुडाल्याची घटना घडली. बोटीवर 5 खलाशी होते, त्यापैकी 4 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. तर 1 खलाशी बेपत्ता आहे. रामचंद्र पवार असं या खलाश्याचं नाव आहे. कोस्टगार्डकडून त्याचा शोध सुरू आहे.
राजीवडा परिसरातील रफिक मजिद फणसोपकर यांची अलिना नामक बोट बुधवारी रात्री मच्छिमारीसाठी गेली होती. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास मिर्या जवळच्या समुद्रात मासेमारी करत असताना ही बोट बुडाली. योग्य वेळी नौकेचे इंजिन सुरू न झाल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत बोटीवरील 4 खलाशी वाचले, तर रामचंद्र पवार नामक खलाशी बेपत्ता आहे. या दुर्घटनेतील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बेपत्ता रामचंद्र पवार यांचा कोस्टगार्डच्या पथकाकडून शोध सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेत बोटीचं पूर्णतः नुकसान झालं आहे.