रत्नागिरी : राज्यात मान्सून सक्रिय झाला असल्याचं हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या काही भागात मान्सूनने दमदार हजेरीही लावली आहे. पण धो धो कोसळणाऱ्या कोकणात मात्र पाऊस हुलकावणीच देताना पहायला मिळत आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा लपंडाव सुरू आहे. दरवर्षी जून महिन्यात धो-धो कोसळणारा पाऊस यावर्षी मात्र किरकोळ सरींवर पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात गायब झालेल्या पावसानं आज हजेरी लावली. दुपरनंतरही पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या, मात्र गेल्या वर्षीच्या जून महिन्यातल्या तुलनेत यावर्षी जेमतेम ३० टक्केच पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी १ जून ते २६ जून २०१८ पर्यत सरासरी १०७६ मिलिमिटर पाऊस पडला होता यावर्षी मात्र १ जून ते २६ जून २०१९ पर्यत सरासरी केवळ ३०६ मिलिमिटर पाऊस पडला आहे. यावर्षी आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात ३२१ मिलिमिटर, दापोली २८९ मिलिमिटर, खेड २१८ मिलिमिटर,गुहागर १८१ मिलिमिटर,संगमेश्वर ४७३ मिलमिटर, रत्नागिरी २४६ मिलिमिटर,लांजा ३४८ मिलिमिटर, राजापूर ४३९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे..
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या जूनच्या तुलनेत यावर्षी फक्त 30 टक्के पाऊस
सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा
दरम्यान रत्नागिरी जिल्हयात 29 जून 2019 पर्यंत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.