रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण रेल्वेत एका चिमुकलीसाठी सोशल मिडियाद्वारे दुध उपलब्ध करून देणार्या रत्नागिरीतील महिलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मिडियातून मदतीला धावून जाणे म्हणजे काय असते? याचा आदर्शच त्यांनी समाजासमोर घालून दिला आहे. तिरुवनवेली एक्स्प्रेसमधून आईवडीलांसह लहानगी कार्तिकी प्रवास करत होती. तिला भूक लागल्याने तिच्या आईने दुधाची बाटली काढली आणि ते खराब झाल्याचे तिच्या लक्षात आले. लहनग्यांसाठी रेल्वेत दूधाची सुविधा उपलब्ध नव्हती, आता काय करायचे? असा प्रश्न मातेसमोर उभा राहीला. या डब्यातील प्रवासी नेहा बापट यांनी त्या मातेची घालमेल पाहिली आणि क्षणार्धात सोशल मिडियावर मोहिम उघडली. त्यांना अनघा निकम-मकदूम यांची मदत मिळाली. अखेर या लढ्याला यश येऊन रेल्वेने कार्तिकीसाठी दुध उपलब्ध करून दिले.
कार्तिकीसह तिचे आईवडिल कोकण रेल्वे मार्गावर हापा–तिरुवनवेली एक्स्प्रेसमधून गुजरात ते तिरुवनवेली असा प्रवास करत होती. प्रवासात तिच्यासाठी घेतलेले दुध नासले. गाडीने पनवेल स्थानक सोडले होते. रेल्वे थेट रत्नागिरीला थांबणार असल्याने काय करावे त्यांना सूचेना. रत्नागिरीच्या नेहा बापट हा यांना आईची व्याकूळता सहन झाली नाही. कार्तिकीला दुध मिळवून देण्याचा निर्धार करत त्यांनी पँन्ट्रीकार ते फेरीवाल्यांपर्यंत सर्वांना विचाले. मात्र दुध उपलब्ध नव्हते.
नेहा यांनी फेसबुकवर आवाहन केले. सोशल मिडियातून दुधासाठी प्रयत्न सुरू झाले. रत्नागिरीतल्या अनघा निकम-मकदूम यांना फेसबुकवर नेहा यांचे आवाहन दिसले. त्यांनी कोकण रेल्वेला ट्विट केले. रेल्वेनेही तातडीने दखल घेतली आणि वेगाने चक्रे फिरली. एक संदेश अनघा यांना आला. त्यात कोलाड रेल्वे स्थानकावर दूध घेऊन रेल्वेचा माणूस तयार आहे,” असे सांगण्यात आले. अनघा यांनी नेहा यांना सांगितले. कोलाडला ट्रेन थांबण्यात आली आणि नेहा यांनी केलेल्या परिश्रमाचे चीज होऊन कार्तिकीला दुध मिळाले.