रत्नागिरी, 31 may : रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर आणि दापोली पाठोपाठ आता रत्नागिरीतही समुद्रकिनारी मृत डॉल्फिन सापडला. चवंडे वठार येथे मृत डॉल्फिन सापडला आहे. रविवारी सकाळी समुद्रकिनारी येथील नागरिकांना डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. दोन महिन्यांत 6 मृत डॉल्फिन किनाऱ्याला लागले, जिल्ह्यात मृतावस्थेत सापडणाऱ्या डॉल्फिनचा विषय दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील पाळंदे आणि सालदुरे गावच्या किनाऱ्यावर दोन डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळले होते. तसेच गुहागरमध्येही डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडला होता. गुहागर आणि दापोलीत दोन महिन्यांत सहा डॉल्फिन माशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या डॉल्फिन माशांच्या मृत्यूचं गुढ वाढलं होतं. अशातच आज रत्नागिरीतही मृत डॉल्फिन सापडला.
या माशांचा मृत्यू कोणत्या व्हायरसमुळे झाला आहे की डॉल्फिन माशांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने मृत्यू होत आहेत, याचा शोध या विषयांतील अभ्यासक घेत आहेत.