रत्नागिरी, 15 June : हौसेला मोल नाही असं म्हणतात ते काही खोटं नाही, कारण रत्नागिरीत एकाने चक्क चांदीचा मास्क बनवून घेतला आहे. सध्या या व्यक्तीची आणि त्यांच्या मास्कची चर्चा रत्नागिरीत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कला सध्या मोठी मागणी आहे. प्रत्येकजण आता मास्क वापरताना दिसतो. कोण N95, तर कोण अगदी साध्या मास्कला देखील आता पसंती देत आहे. पण, रत्नागिरीत मात्र असा एक व्यक्ती आहे ज्यानं चक्क खास चांदीचा मास्क तयार करून घेतला आहे. शेखर सुर्वे असं या व्यक्तिचं नाव आहे. शेखर सुर्वे रत्नागिरीतील मांडवी येथे राहतात. त्यांनी खास कोल्हापूरहून चांदीचा मास्क तयार करून घेतला आहे. या मास्कची किंमत 4000 रूपये असून त्याचं वजन 60 ग्रॅम इतकं आहे. चांदीचा मास्क वापरणारे शेखर सुर्वे हे जिल्ह्यातील तरी पहिलेच व्यक्ति आहेत. याबाबत माहिती देताना सुर्वे सांगतात की, मला सोन्या चांदीची आवड आहे. मी चांदीचा वर्ल्डकपही बनवून घेतला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी मी मोबाईलवर चांदीचा मास्क पाहिला. असा मास्क आपल्यालाही घेता यावा, यासाठी मी माझ्या सोनाराला विचारलं, त्यानी मग तो कोल्हापूरहून मागवून घेतला. केवळ एक हौस म्हणून आपण तो घेतल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.