रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : निसर्गाचे शुक्लकाष्ठ कोकणातल्या आंबा बागायतदारांच्या मागे लागलेलेच असते. ओखी वादळाच्या संकटातून आंबा उत्पादक शेतकरी सावरतो न सावरतो तोच आता ढगाळ वातावरण आणि आज सकाळी पडलेल्या तुरळक पावसामुळे नवीन संकट उभं ठाकले आहे.
कालपासून (मंगळवार) जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच जिल्ह्यात आज पहाटे अचानक पावसाच्या सरी पहायला मिळाल्या. पहाटेपासून रत्नागिरी, सावर्डे, लांजा, संगमेश्वर तालुक्यात हा पाऊस झाला. पावसाच्या जोरदार सरी जरी नसल्या तरी या पावसानं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी सुरु झाल्या, जवळपास अर्धातास या सरी कोसळत होत्या. या पावसानं सकाळपासून ढगाळ हवामान आहे. फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडल्याने याचा मोठा फटका आंबा पिकाला बसणार आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता बागायतदार व्यक्त करीत आहेत. ढगाळ वातावरणाचा आंबा पिकावर परिणाम होणार आहे. कारण या वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.