रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी जिल्हयात पावसाची रिमझिम सुरू असून गेल्या 24 तासांत सरासरी 31.89 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात पडला.
राज्यात पावसाचे आगमन झाले असून दिवसभरात ठिकठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. रत्नागिरी जिल्ह्यात 31.89 तर मंडणगडमध्ये 73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल राजापूर तालुक्यात 65 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर दापोलीमध्ये 9 मिमी, खेड- 40 मिमी, गुहागर-30 मिमी, चिपळूण-09 मिमी, संगमेश्वर-26 मिमी, रत्नागिरी-15 मिमी आणि लांजामध्ये 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान प्राथमिक अहवालानुसार मंडणगड तालुक्यात मौजे पिंपळवाडी येथे बौध्दवाडी कडे जाणार रस्ता पावसामुळे सरंक्षण भिंत खचली आहे. दापोली तालुक्यात मौजे खेपी येथे राजाराम धोंडू बर्गे यांची शेतकी गाय पावसामुळे मृत्यु झाली असून 65 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यात मौजे तुळशी खु. येथील दत्ताराम धोंडू उत्तेकर यांच्या घराचे पावसामुळे अशंता 73 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात मौजे आंबववाडी येथे यशवंत धोंडू केपडे यांच्या गोठयावर वीज पडून गोठयाचे अंशत: 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असून जिवीत हानी नाही. मौजे फणसवणे येथील 2 घरावर झाड पडून घराचे अंशत: नुकसान झाले आहे.