मुंबई, : खेड, मंडणगड, दापोली या तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती बदलावी यासाठी या परिसरात नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत विहिरींना तात्काळ मान्यता देऊन कामे तातडीने सुरू करावीत, तसेच पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणांचा विकास करुन त्याचा पुरवठ्यासाठी उपयोग करुन घ्यावा, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.
बुधवारी(ता.५) मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संबंधितांना सूचना देताना कदम बोलत होते. या बैठकीत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अवर सचिव रा.म. घाडगे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड आणि दापोली तालुक्यातील नळपाणी पुरवठा योजनेत, राष्ट्रीय पेय जल योजनेच्या आराखड्यात विहीरी समाविष्ट करून तत्काळ कामे पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, असे कदम यांनी यावेळी सांगितले.
या परिसरातील ६१ वाडी , वस्त्यांत राबविण्यात येणा-या जिल्हास्तरीय योजना लवकर पूर्ण कराव्यात, तसेच टंचाई आराखड्यानुसार 10 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यांना तातडीने मान्यता देऊन कामे सुरू करावीत, असेही श्री कदम यांनी सांगितले. टंचाईसदृश गावांचा जलयुक्त शिवार योजनेंतर्गत समावेश करावा, असेही ते म्हणाले.