रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. विशेषतः दक्षिण रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि राजापूरमध्ये तर गेल्या 24 तासांत 200 मिलीमीटर पेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे.
तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल हा हवामान खात्याचा अंदाज रत्नागिरीत खरा ठरताना पाहायला मिळतोय. कारण मान्सूनच्या आगमानापासून सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीत. गेल्या 24 तासांत तर रत्नागिरी जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाची बॅटिंग अद्यापही सुरूच आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 1155 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी 128.33 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस रत्नागिरीत पडला असून रत्नागिरीत तब्बल 239 मिमी पावसाची नोंद झाली आहे, त्याखालोखाल राजापूर तालुक्यात 205 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर लांजा तालुक्यात 187 मिमी, गुहागरमध्ये 140 मिमी, चिपळूण 111 मिमी पाऊस गेल्या 24 तासांत पडला आहे. संगमेश्वर 85 मिमी, दापोली 77 मिमी, खेड 58 मिमी, मंडणगडमध्ये 53 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान मुसळधार पावसाने काही ठिकाणी झाडं तसेच दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.