रत्नागिरी, प्रतिनिधी : 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी लसीकरण सुलभ व्हावे म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभाग व रत्नागिरीतील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हापरिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हापरिषद उपाध्यक्ष उदय बने, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, उद्योजक सौरभ मलूष्टे, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, तालुका आरोग्यधिकारी गावडे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांगांना लसीकरणावेळी अनेक समस्या निर्माण होतात. रांगेत देखील अनेक वेळा ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय, शहरी भागात लसीकरण ऑनलाईन पद्धतीनं होत असल्यानं त्यात डोस मिळण्यासाठी सायास करावे लागतात. हीच बाब लक्षात घेत सामाजिक कार्याचा वसा घेतलेले सौरभ मलूष्टे यांनी जेष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी फिरते लसीकरण केंद्र राबविण्याची संकल्पना मांडली. तसेच ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवताच जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड व आरोग्य सभापती उदय बने यांनी या संकल्पनेला तत्काळ मंजुरी दिली. रत्नागिरी शहरातील विविध भागात जाऊन ही लसीकरण व्हॅन जेष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कोव्हिड चा सामना खऱ्या अर्थाने करायचा असेल तर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. जेष्ठ नागरिकांचे लसीकरण विनासायास पार पडावे या तळमळीने उद्योजक सौरभशेठ मलूष्टे मागील अनेक दिवसांपासून काम करीत आहेत. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी सौरभ मलूष्टे यांनी मोफत रिक्षाची देखील व्यवस्था केली होती. सामाजिक कार्याने झपाटलेल्या या उद्योजकाने आजवर अनेकांच्या अडचणीच्या काळात धावून जात आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. जेष्ठांना लसीकरण सुविधा विनासायास मिळावी यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सौरभ मलूष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग जेष्ठांसाठी खूप अडचणीचा होत होतं, पण या उपक्रमामुळे जेष्ठांना दिलासा मिळणार आहे. यामुळेच हा उपक्रम लसीकरण प्रक्रिया वाढीस मदतीचा ठरणार आहे.