
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या जानेवारीमध्ये होणाऱ्या कीर्तनसंध्या महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा सन 1920 ते 1947 या कालखंडातील ऐतिहासिक स्वातंत्र्ययुद्ध उलगडणार आहेत. विविध क्रांतीकारकांच्या कथांसह महाराष्ट्रातील संतपंचकांचे कार्यसुद्धा ऐकता येणार आहे. यंदा कीर्तनसंध्याचे 8 वे वर्ष असून शहरातील आठवडा बाजार येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे 2 ते 6 जानेवारी 2019 रोजी हा किर्तनसंध्या महोत्सव होणार आहे. कीर्तनसंध्या परिवारातर्फे आज झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी अवधूत जोशी, नितीन नाफड, रत्नाकर जोशी, मकरंद करंदीकर, महेंद्र दांडेकर, गौरांग आगाशे, गुरुप्रसाद जोशी, योगेश हळबे, उमेश आंबर्डेकर उपस्थित होते.
रत्नागिरीत होणारा कीर्तनसंध्या महोत्सव महाराष्ट्रात नावाजलेला कीर्तन महोत्सव आहे. गर्दीचे उच्चांक गाठणार्या या महोत्सवात यंदा अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील. यंदा श्रोत्यांना हा कार्यक्रम अर्धा तास जास्त अनुभवायला मिळणार आहे, त्यामुळे सायंकाळी 6 ऐवजी 5.30 वाजता सुरवात होईल. दरवर्षीप्रमाणे 32 फूट बाय 20 फुटांचा भव्यदिव्य रंगमंच, दरवर्षीप्रमाणे श्रोत्यांसाठी एसटी गाडीची सुविधा मिळणार आहे. रंगमंचाच्या बाजूला दोन स्क्रीनसुद्धा लावणार आहे. भारतीय बैठकव्यवस्था आणि खुर्चीवर बसण्याची सुविधा आणि दुचाकी, चारचाकीसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था आहे.
पूर्वरंगामध्ये महाराष्ट्रातील संतपंचक म्हणजेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी, संत एकनाथ आणि संत नामदेव यांच्याविषयी आफळेबुवा उलगडणार आहेत. उत्तररंगामध्ये संपूर्ण भारतभर क्रांती घडवून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी योगदान देणार्या क्रांतीकारकांची माहिती, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ, कथा ऐकायला मिळणार आहेत. यामध्ये क्रांतीकारक हरनामसिंग, गणेशपंत सावरकर, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना, लाला लजपतराय आणि अनेक क्रांतीकारकांच्या कथा जाणून घेता येतील. तसेच दुसर्या महायुद्ध व भारतीय स्वातंत्र्याच्या काही गोष्टीसुद्धा बुवा सांगणार आहेत. त्या अनुषंगाने काही गीतेसुद्धा शेवटच्या टप्प्यात स्क्रीनवर पाहायला मिळतील.
गेल्या सात वर्षांत कीर्तनसंध्येमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, पेशवाईतील मराठशाहीची देशव्यापी झुंज, स्वराज्याकडून साम्राज्याकडे, 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध आणि 1857 ते 1920 या कालखंडातील इतिहास कीर्तनाद्वारे मांडला आहे. महोत्सवात बुवांना हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), प्रथमेश तारळकर (पखवाज) यांची संगीतसाथ लाभणार आहे. निवेदन निबंध कानिटकर करणार आहेत. ध्वनीव्यवस्था सुप्रसिद्ध एस. कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत आणि बैठक व्यवस्था ओम साई डेकोरेटर्स करणार आहेत.