रत्नागिरी -: जिल्हयात कोरोना विषाणू संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण बरा झाला असून जिल्हयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता शुन्यावर आली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
येथील अल्पबचत सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे हीच स्थिती कायम राखायची असेल तर लॉकडाऊन काळात सर्वांनी शासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हयाच्या सर्व सिमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. त्या 15 एप्रिलपर्यंत कायम स्वरुपी कडकपणे बंद राहतील तसेच होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत याची खबरदारी नागरिकांनी घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले. आगामी काळात गरज पडल्यास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास कोरोना रुग्णालयात बदलण्यात येईल अशी तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र तशी वेळ येवू नये यासाठी लॉकडाऊनचे पालन करा असे सामंत म्हणाले.