
रत्नागिरी : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरीत रविवारी 30 डिसेंबर रोजी ‘हिंदू राष्ट्र – जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रखर हिंदुत्ववादी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक हिंदू जनजागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक मनोज खाड्ये तसेच सनातनच्या संत सद्गुरू स्वाती खाड्ये मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहीती हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर यांनी २५ डिसेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी, सुरेश शिंदे, सनातन संस्थेचे गोविंद भारद्वाज, रणरागिणी संघटनेच्या शुभांगी मुळ्ये यावेळी उपस्थित होते.
विनोद गादीकर म्हणाले की सध्या देशात सेक्युलर वादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन सुरू आहे. देशात समान नागरी कायदा केला जात नाही, तसेच गोहत्या, लव्ह जिहाद, हिंदूंची धर्मांतरे सुरू आहेत. जातीच्या आधारे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंनी हे किती दिवस सहन करायचे. देशातील बहुसंख्यांक हिंदूंवरील अन्याय दूर होण्यासाठी ‘हिंदू राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे, आणि त्यासाठीच ‘हिंदू राष्ट्र- जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती गादीकर यांनी दिली. हिंदू राष्ट्र-स्थापनेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात येणार असून हिंदू राष्ट्राची स्थापना, धर्मशिक्षण, साधना आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
















