रत्नागिरी :रत्नागिरी नगर परिषदेच्या २०१९-२० साठीच्या अर्थसंकल्पात रत्नागिरी नगर परिषदेच्या नव्या इमारतीसाठी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ भारत योजनेचे बक्षिस रक्कम पाच कोटीही नव्या इमारतीच्या बांधकामासाठीच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी नगर परिषदेच्या विशेष सभेत सन २०१९-२० साठीचे १५९ कोटी २१ लाख १८ हजार २४४ रूपयांचे मूळ तसेच १५७ कोटी ९८ लाख ७७ हजार खर्चाचे आणि १ कोटी २२ लाख ४१ हजार २४४ रूपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे नव्या आर्थिक वर्षात रत्नागिरीकरांवर वाढीव कराचा कोणताही बोजा चढवण्यात आलेला नाही. अर्थसंकल्प मंजुरीसाठी प्रभारी नगराध्यक्ष बंडया साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा घेण्यात आली. या बैठकीत रनपच्या १५९ कोटी २१ लाख मूळ आणि १५७ कोटी ९८ लाख खर्चाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये पथदीप करापोटी १ लाख, गौण खनिज अनुदान ५० हजार, नगर पालिका गार्डन भाडे १ लाख, पार्किंग आकार १ लाख, घनकचरा व्यवस्थापन सेवाशुल्क १ लाख, करदेयके जाहीरात १ लाख, आदी जमा रकमेचा समावेश करण्यात आला आहे. यासह नगर परिषद शाळा दुरूस्ती ९० लाख, व्यायाम शाळा सामान खरेदी व दुरूस्ती ५० लाख, पाणी पुरवठा वाहने भाडयाने घेण्यासाठी २० लाख, उद्यान सुधारणा करण्यासाठी २० लाख, रस्ते डांबरीकरण २ कोटी, सार्वजनिक गटर, पुल, वहाळ काँक्रीटीकरणसाठी ३ कोटी, बोअरवेल, विहीरी खोदाई १३ लाख, बोनस तसेच सनुग्रह अनुदान ५० लाख आदी खर्चाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.