रत्नागिरी : रत्नागिरीत गेली 10 वर्ष होत असलेला पुलोत्सव यावर्षी 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान सावरकर नाट्यगृह येथे साजरा होणार आहे. यावर्षी या महोत्सवाचं अकरावं वर्ष आहे. आर्ट सर्कलकडून ही माहिती देण्यात आली आहे. यावर्षी पुलोत्सव अधिक खास असणार आहे कारण, हा पुल जन्मशताब्दी सोहळा आहे.
7 डिसेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते आणि आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांच्या उपस्थितीमध्ये पुलोत्सवाचे उद्घाटन केले जाईल. प्रतिवर्षी देण्यात येणारा पुलोत्सव सन्मान पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर सुप्रिया चित्राव त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. मराठी रंगभूमीवरचा अतिशय राजबिंडा आणि देखणा कलाकार तसेच, सामाजिक भान राखूनही त्याबद्दल क्वचित बोलणारे विक्रम गोखले या मुलाखतीदरम्यान रत्नागिरीकरांशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत.
विनोदी लेखक म्हणून पुल लोकप्रिय असले तरीही काव्य, चिंतन, सामाजिक भान अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. अशाच जरा हटके पुलंचं दर्शन म्हणजे या दिवशी सादर होणारा कार्यक्रम “अपरिचित पुल!” या कार्यक्रमामध्ये सतिश आळेकर आणि चंद्रकांत काळे यांच्यासोबत गिरीश कुलकर्णी यांचा सहभाग असेल.
पुलोत्सवाच्या दुसर्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी रशियन नाटककार व्हॅलदलीन दोझोत्सेव यांच्या पुलंनी रूपांतरित केलेल्या “एक झुंज वार्याशी” हे नाटक सादर होणार आहे. हे नाटक सामाजिक, राजकीय आणि वैचारिक भूमिकांचा सजगपणे विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे म्हणूनच आजच्या या धकाधकीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्येही त्याचे संदर्भ अजूनही टिकून आहेत. याच दिवशी पुलंच्या सामाजिक जाणीवेचा पैलू अधोरेखित करणारा “सामाजिक कृतज्ञता” पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
पुलोत्सवाचा समारोप हा पुलंच्या अनेकविध पैलूंचा मागोवा घेणारा दृकश्राव्य सांगितिक अविष्कार “बहुरूपी पुल” या कार्यक्रमाने होईल. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन पराग बापट यांनी केलेले असून यामध्ये अनेक प्रसिद्ध गायक कलाकार सहभागी होणार आहेत. चित्रपट आणि टीव्ही अभिनेते विजय पटवर्धन यांनी सादर केलेली स्किट्स या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे. या कार्यक्रमामध्ये पुलंचे गायन, संगीत दिग्दर्शन तसेच, चित्रपट व रंगभूमीवरील योगदानाबद्दल अनेक विविध दृकश्राव्य तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करण्यात येतील. अशी माहिती आर्ट सर्कलकडून देण्यात आली आहे.