रत्नागिरी : येथील मुख्य बाजार पेठेत आज मध्यरात्री अचानक आग लागण्याची घटना घडली. यात तीन दुकाने जळून खाक झाली तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्नीशमन दलाने पहाटे चारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहराच्या मारुती आळी परिसरात असणार्या मारुती मंदीरासमोरील एका दुकानाने अचानक पेट घेतला. ही आग पसरत गेली. शेजारील घरांना धोका निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. नगरपालिका आणि फिनोलेक्स कंपनीचा असे एकूण दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु, विझवलेली आग पुन्हा पहाटे ३ वाजता लागली. यानंतर तासाभराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग विझवण्यात अडथळे येत असल्यामुळे एका इमारतीचा काही भाग जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आला. आगीत कपडे, चप्पल आणि एक जनरल स्टोअर्स अशी तीन दुकाने खाक झाली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. ५० लाखांहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.