रत्नागिरी : कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम काम झाले आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा कोरोना मुक्त होईल अशी आशा आहे. सोबतच आगामी काळात अधिक काळजी घेऊन सर्वांनी काम करावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी केले
कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, भास्कर जाधव तसेच शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती होती तर गुहागर-मंडणगडचे आमदार योगेश कदम व्ही.सी.द्वारे यात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात असणारी स्थिती व करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत दिली तर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कायदा व सुव्यवस्था बाबत सविस्तर माहिती सादर केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी ग्राम कृती दल तसेच ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य सुविधा याबाबत माहिती दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी केवळ 6 जण पॉझिटिव्ह आढळले, त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एक रुग्ण बरा झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर रुग्णांवर उपचार सुरू असून ते लवकरच बरे होतील अशी स्थिती आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बोर्डे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातून तपासणी नमुने सध्या मिरज येथे पाठवले जात आहेत. त्याठिकाणी क्षमता कमी असल्याने अहवाल येण्यास विलंब होत आहे .यामुळे नमुने यापुढे पुणे येथे पाठविण्याची घोषणा पालकमंत्री परब यांनी या बैठकीत केली.
स्पष्ट सूचना लोकांपर्यंत पोहचवा
केशरी कार्डधारकांना मर्यादा वाढवून धान्य सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र हे धान्य मे महिन्यापासून मिळणार आहे. याबाबतचा स्पष्ट सूचना लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून गैरसमज अथवा गोंधळ होणार नाही असे पालकमंत्री म्हणाले.
अनेकजण जिल्ह्यात अडकून पडले आहेत आणि त्यांचे रेशनकार्ड मुंबईत आहेत, अशा सर्वांना रेशन पोर्टेबिलिटी चा लाभ दिला जात आहे. असा लाभ घेणाऱ्यांची संख्या 9 हजार आहे.
त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांना रेशन कार्ड द्यावे असे वाटत असेल तर याबाबतचा निर्णय केंद्र शासन घेणार आहे. तो निर्णय होईपर्यंत या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी केल्या .
शिवभोजन केंद्र वाढवा
सध्या जिल्ह्यात 13 ठिकाणी शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 1250 थाळयांची व्यवस्था आहे. या केंद्रांची संख्या वाढविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. येणाऱ्या काळात केंद्रांची संख्या वाढवणे तसेच या सर्वांच्या संध्याकाळ भोजनाचे नियोजन करण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना ॲङ परब यांनी केली.
आपत्तीतील आपत्ती
कोरोनाचे संकट एका बाजूला सुरू आहे, या आपत्तीच अवकाळी पावसाने 2 तालुक्यात नुकसान झाले आहे. यातील बाधित व्यक्तींना मदत देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
येणाऱ्या उन्हाळ्याच्या काळात काही ठिकाणी टॅंकरद्वारे पाणी द्यावे लागणार आहे. त्याबाबतचे अधिकार तालुकास्तरावर वर्ग करण्यात आले आहेत. 20 एप्रिल नंतर काही प्रमाणात सूट मिळणार असली तरी लॉकडाऊन मधील जिल्हा बंदी कायम राहणार आहे. या स्थितीत जिल्ह्यातील कामगारांच्या मदतीने तातडीची रस्ते, पूल आणि घर दुरुस्तीचे काम पूर्ण करून घ्या असेही ते म्हणाले.