रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा सावंत आणि उपाध्यक्षपदी संतोष थेराडे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतली. सावंत या शिरगांव गटातून तर थेराडे हे कडवई गटातून निवडून आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या २६ व्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. ५५ पैकी तब्बल ३९ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने मोठा विजय प्राप्त केला. रत्नागिरी, संगमेश्वर आणि लांजा-राजापूरमध्ये शिवसेनेला मिळालेले यश पाहता अध्यक्षपद या तीनपैकी एका तालुक्याला दिले जाईल, हे निश्चित होते. सुरुवातीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी रचना यांचे नाव चर्चेत होते. मात्र अखेरच्या टप्प्यात रत्नागिरीतल्या शिरगाव गटातून निवडून आलेल्या स्नेहा सावंत याचं नाव पुढे आले. लांजा तालुक्यातील स्वरुपा साळवी यांच्या नावाचीही चर्चा होती.
रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्वच जागा निवडून आणण्यात आमदार उदय सामंत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख विजय कदम यांच्या उपस्थितीत अखेर स्नेहा सावंत यांनी बाजी मारली.
रत्नागिरी तालुक्याला २० वर्षांनंतर अध्यक्षपद
या आधी रत्नागिरी तालुक्याला २० वर्षांपूर्वी जयसिंग घोसाळे यांना अध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर इतर तालुक्यांना हे पद मिळाले होते. आता तब्बल २० वर्षांनंतर स्नेहा सावंत यांची निवड झाली.