
ग्रामिण पोलिसांची विशेष तपासणी मोहिमेचा स्पेशल रिपोर्ट.
कोकण म्हणजे प्रती काश्मीरच. त्यामुळेच लाखो पर्यटक पावसाळी आनंद घेण्यासाठी कोकणाकडे वळतात. खास करून फेसाळणारे धबधबे… मात्र इथं निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांसोबत तळीरामांची संख्या मोठी असते. त्यामुळे अनेक पर्यटकांचा भ्रमनिरास होतो. काही तर थेट धबधब्याच्या प्रवाहाखाली रंगित पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी बसतात. पण धबधब्यांच्या ठिकाणी आता दारू पिणे महागात पडू शकते. कारण तुम्ही मद्यपान चाचणीत मद्यपान केलेले आढळले तर तुमच्यावर कारवाई होवू शकते. आता थेट रत्नागिरी ग्रामिण पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे. धबधब्यांवर तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी शनिवार आणि रविवारी ठिकठिकाणी सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून मद्यापी दिसला की मद्यपान केले आहे का हे तपासणीसाठी यंत्राचा वापर करुन हि कारवाई पोलिस करत आहेत. पोलिसांची एक टिम सध्या रत्नागिरी जवळच्या पानवल, उक्षी आणि निवळी घाटातल्या धबधब्यांवर गस्त घालते. या मोहिमेतून सध्या पाच तळीरामांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या इथे कुटुंबासोबत येणारे पर्यटक मात्र चांगलेच खुश आहेत व त्यांनी पोलिसांच्या मोहिमेचं कौतूक देखील केलं आहे. रत्नागिरी ग्रामिण पोलिसांचा आदर्श राज्यातल्या सर्वच पर्यटनाच्या ठिकाणी ठेवावा अशी मागणी आता पर्यटक करू लागले आहेत.
पानवल, उक्षी आणि निवळी तसेच चिपळूणच्या सवतसडा या धबधब्यांवर सध्या पोलिसांची करडी नजर आहे. मद्याच्या नशेत अपघात होऊ नयेत म्हणून पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. पावसात तयार होणाऱ्या धबधब्यांवर तर पर्यटकांचा धुडगूस सुरू असतो. कपडे काढून नाचणे, मुलींकडे बघून अचकट-विचकट हावभाव करणे, मद्याच्या बाटल्या घेऊनच धबधब्याखाली भिजणे..त्यामुळे आजवर तळीरामावर कुणाचा वचक नव्हता. मात्र आता तसं नाही उलट आता रत्नागिरीत धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांचा वचक असणार आहे.