
जिल्हयात होणारा कोरोना नमुन्यांची तपासणी
रत्नागिरी, 8 जून : रत्नागिरी जिल्हयात कोरोना तपासणीची सुविधा उद्यापासून उपलब्ध होत असून यासाठी 1 कोटी 07 लाख रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन उद्या 9 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. कोव्हीड- 19 ची संख्या सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी खास बाब म्हणून या प्रयोगशाळा उभारणीस मंजूरी प्रदान केली होती. सध्या रुग्णांचे तपासणी नमुने कोल्हापूर आणि मिरज येथे पाठविण्यात येतात. त्या ठिकाणी इतरही जिल्हयातून नमुने तपासणीसाठी येतात. त्यामुळे या जिल्हयातील तपासणी नमुन्याचे अहवाल विलंबाने प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर या प्रयोगशाळा उभारणीची मागणी पुढे आली होती. मंजूरी प्राप्त होताच युध्दपातळीवर प्रयोगशाळा उभारणीचे काम हाती घेऊन अवघ्या 10 दिवसात ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
या उद्घाटन समारंभास मुंबई येथून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव प्रदीव व्यास हे तर रत्नागिरीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या लॅबला मंजुरी देत तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत तसेच एका तासात ९६ अहवाल कसे येतील यासाठी आणखी एक अतिरिक्त मशीन मागविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं राऊत यांनी रत्नागिरीत बोलताना सांगितलं














