रत्नागिरी,(आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनादृष्ट्या विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. येथील धार्मिक क्षेत्र आणि पर्यटनस्थळे यांचा विकास केला जाणार आहे. त्यानुसार श्री क्षेत्र मार्लेश्वर तसेच राजापूर येथील उन्हाळे गंगातिर्थ या धार्मिक क्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या साठी २ कोटी ८३ लाख ८१ हजार इतका निधी मंजूर झाला आहे.
श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या विकासासाठी १ कोटी ९० लाख तसेच उन्हाळे गंगातिर्थच्या विकासासाठी ९३ लाखांच्या निधीला पर्यटन विभागाने मंजूरी दिली आहे.
रविंद्र वायकर हे रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आहेत. विविध तालुक्यांतील पर्यटन व धार्मिक क्षेत्रांच्या विकासाचा संकल्प त्यांनी केला आहे. ‘पर्यटन महोत्सव’ ही संक्ल्पना त्यांनी येथे सुरु केली. तसेच जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांचा विकास व्हावा, यासाठी पर्यटन विकास आराखडा त्यांनी तयार केला आणि तो वित्तमंत्री तसेच पर्यटनमंत्री यांना सादर केला होता.
त्यानुसार प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील परिसर सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाने तब्बल १ कोटी ९० लाख ६५ हजार इतका निधी मंजूर केला. या तिर्थक्षेत्रात भक्त निवास तसेच सभामंडप उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ६८ लाख इतका निधी, शौचालयांसाठी १२ लाख ६५ हजार तसेच पाथवेसाठी रुपये १० लाख इतका निधी पर्यटन विभागाने मंजुर केल्याची माहिती पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली.
उन्हाळे गंगातिर्थचाही विकास
राजापूर येथील उन्हाळे गावामध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत. येथूनच जवळ मोकळ्या जागेत चौदा कुंड आहेत. ही कुंड काळ्या पाषाणांनी बनविलेली आहे. या स्थानाला तीर्थयात्रेचे स्वरुप प्राप्त होते. या पर्यटन क्षेत्राला ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. येथील पर्यटन क्षेत्राला चालना देण्याबरोबरच मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटन विभागाने तब्बल ९३ लाख ८१ हजार इतका निधी मंजुर केला आहे. या ठिकाणी विश्रामगृह, दुकानासाठी ओटा, पाण्याची सोय, पाणी निचरा सोय, शौचालय, बदलाची खोली, बगीचा व इतर सुविधा, हायमास्ट, संरक्षक भिंत व दरवाजे, चैनलिंग, रस्त्याच्या दोन्ही बाजुला माहिती फलक आदि सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती वायकर यांनी दिली.